१९४० साल होते. भारताचे स्वातंत्र्य दृष्टीपथात आले होते. या स्वातंत्र्याचा फायदा बहुजनांना, विशेषत: गरीब, दुबळया उपेक्षितांना व्हावा म्हणून कोकणचे गांधी कै. पू. अप्पासाहेब पटवर्धन झटत होते. पूज्य अप्पासाहेब पटवर्धन यांनी कुणबी सेवा संघ, लांजा, ही संस्था १९४० साली स्थापन केली. गांधीवादी विचारांने प्रभावित होऊन गोरगरीबांच्या कल्याणाचा विचार करणारे अनेक सहकारी पू. अप्पांनी या संस्थेच्या कामाला लावले. कै. अनंतराव रेगे वकील, स्वातं«य सैनिक, पत्रकार व खासदार कै. मोरोपंत जोशी, स्वातं«य सैनिक कै. नानासाहेब वंजारे, जीवनव्रती शिक्षण तपस्वी कै. सामंत गुरुजी, लोकनेते व खासदार कै. शामराव पेजे ही त्यातील ठळक नावे. या खेरीज तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर, थोर गांधीवादी कार्यकर्ते ठक्कर बाप्पा असे नामवंत, संस्थेचे आजीव सभासद होते. असा गौरवशाली वारसा असलेली आमची संस्था.