सन २०१५-१६ साली बाळासाहेब खेर कृषि उद्योग व प्रशिक्षण केंद्राच्या इमातीवर लोखंडी सांगाडा तयार करुन सिमेंट पत्रे बसविण्यात आले होते. तसेच लोखंडी आय बीम वापरुन व्यासपीठाचे बांधकाम व चारही बाजूच्या भिंतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते. संस्थेचे सन्माननीय माजी विद्यार्थी माजी खासदार अनंतरावजी गीते, माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री व लोकउद्यम मंत्री, भारत सरकार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे बी. सी. जिंदाल, नवी मुंबई या उद्योग समुहाकडून सभागृहासाठी रुपये २०.०० लाख इतकी देणगी मिळवून दिली. माजी विद्यार्थी, संस्थेचे सभासद, हितचिंतक यांनी देणगी स्वरुपात दिलेल्या निधीद्वारे सभागृहाचे आवश्यक तेवढे बांधकाम डिसेंबर २०१७ रोजी पूर्ण करण्यात आले. यासाठी रु. ३०,६६,३३५/- इतका खर्च करण्यात आला. या सभागृहाचे नामकरण व औपचारिक उद्घाटन मा. नामदार अनंतरावजी गीते यांच्या शुभहस्ते दिनांक १३ जानेवारी २०१८ रोजी करण्यात आले. गुरुद्वयांचा स्मृतिमेळावा आणि सेवाव्रती शिंदे गुरुजी स्मृति पुरस्कार वितरण सोहळा या सभागृहात आयोजित करण्यात येतो. या सभागृहाचे नामकरण “सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृह” असे करण्यात आले.
या सभागृहाला ११.२८ मीटर x ६.४ मीटर (७२ चौरस मीटर) आकाराचे भव्य व्यासपीठ आहे. व्यासपीठाच्या कडेला प्रसाधनगृहासह दोन स्वतंत्र खोल्या आहेत. सभागृहाचा आकार २७.४३ मीटर x १५.२४ मीटर (४१८ चौरस मीटर) इतका आहे. या सभागृहाची आसनक्षमता ७०० खुर्च्या इतकी आहे. या सभागृहाला २.२८ मीटर x ३९.६३ मीटर (९०.३५ चौरस मीटर) आकाराची प्रशस्त गॅलरी आहे. स्त्री- पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे, इन्व्हर्टर, जनरेटर सुविधा, पुरेशा पाण्याची उपलब्धता, भोजन तयार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष आणि प्रशस्त वाहनतळ उपलब्ध आहे. तळमजल्यावर २५.९ मीटर x १३.७० मीटर (३५४.८३ चौरस मीटर) आकाराचा स्वतंत्र भोजनकक्ष उपलब्ध आहे. सभागृहाचा परिसर फुलझाडे, शोभिवंत झाडे याने सुशोभित केलेला आहे. सभागृह दापोली एस्. टी. स्टॅण्डपासून २ किलोमीटर अंतरावर आहे. सभागृहाला एकॉस्टिक कन्सल्टंट यांच्या सल्यानुसार आहुजा कंपनीची ध्वनीवर्धक यंत्रणा बसविण्यात आली आहे. सभागृहातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध आहे. सभागृहाचे छत व व्यासपीठ पी. व्ही. सी. साहित्य वापरुन सुशोभित करण्यात आले आहे.