कै. सेवाव्रती पांडुरंग गणपत शिंदे गुरुजी यांनी सुमारे ६० वर्षे अविरतपणे नवभारत छात्रालय आणि सामंत गुरुजी कन्या छात्रालयाचे काम चालू ठेवले. गरीब, कुणबी तत्सम मागास समाजांमध्ये शैक्षणिक जागृती निर्माण करण्याची भूमिका बजावली. नवभारत छात्रालय आणि आपल्या गुरुंच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांनीच स्थापन केलेल्या पू. सामंत गुरुजी कन्या छात्रालय या संस्थांच्या माध्यमातून गरीबांच्या घराघरात शिक्षण, सुसंस्कार व स्वावलंब देण्याचे व्रत त्यांनी स्विकारले. आपल्या ८१ वर्षाच्या आयुष्यातील ६० वर्षे अखंडपणे त्यांनी या सेवाव्रतात घालविली.
या संस्थेतून शिकून गेलेल्या माजी विद्यार्थी/ विद्यार्थिनींनी कै. सेवाव्रती शिंदे गुरुजींच्या स्मारकाविषयी चर्चा करुन त्यांच्या नावाचे प्रतिष्ठान निर्माण करावे असा निर्णय घेण्यात आला. म्हणून “गुरुदक्षिणा” या नावाने स्थापन केलेल्या या निधीचे रु. १५,००,०००/- इतक्या रक्कमेचे लक्ष्य संस्थेने ठरविले होते. या निधीमध्ये रु. १५,००,०००/- इतकी रक्कम जमा करुन ठरविलेले लक्ष्य पूर्ण करण्यात आले आहे. जमा झालेली रक्कम कायम ठेव बँकेत ठेवून त्यावर मिळणारे वार्षिक व्याजातून गुरुजींच्या नावे समाजातील प्रगतीशील शेतकरी, ग्रामीण, शहरी भागातील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, विस्तार कार्यकर्ता, कृषी उद्योजक व समाजसेवक यांना नामवंत व्यक्तींच्या हस्ते सन्मानित करण्याचे ठरविण्यात आले. सेवाव्रती शिंदे गुरुजी स्मृती पुरस्कार निवड समितीची स्थापना करण्यात आली आहे.
पुरस्कारासाठी आलेल्या अर्जांची छाननी करणे, त्यातून योग्य त्या अर्जांची निवड करुन त्या उमेदवाराची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन योग्य उमेदवाराची निवड इत्यादी कामे निवड समितीमार्फत करण्यात येतात. आजतागायत वितरित करण्यात आलेल्या पुरस्कारांची यादी स्वतंत्रपणे परिशिष्टात देण्यात आली आहे.