रत्नागिरीचे माजी खासदार, लोकनेते शामरावजी पेजे हे आमच्या संस्थेची एक प्रेरक शक्ती होते. संस्थेच्या मागे ते सदैव खंबीरपणे उभे राहिले. संस्थेवरील आर्थिक अरिष्टे त्यांनी निभावली. छात्रालयाला स्वावलंबी करणारे कृषि केंद्र उभे करण्यात त्यांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली. वनखात्याच्या ताब्यातील सुमारे सात एकर जागा संस्थेला कायमस्वरुपी मिळवून देण्यात प्रामुख्याने त्यांचेच प्रयत्न कारणीभूत ठरले.

आपल्या या थोर नेत्याचे यथोचित स्मारक म्हणून या प्रकल्पाकडे संस्था पाहते. दापोलीपासून १० कि. मी. अंतरावरील कोळबांद्रे गावी संस्थेने १२.५ एकर जागा खरेदी केली असून त्यात रोपवाटिकेसाठी विविध प्रकारच्या फळझाडांच्या मातृवृक्षांची लागवड केली आहे. या जागेच्या कडेने बारमाही वाहत्या ओढयाचे पाणी जाते. त्यावर पंप बसवून ठिबक सिंचन, सूक्ष्म तुषार सिंचन आदि जलसिंचनाच्या आधुनिक पध्दतींचा  वापर करुन प्रक्षेत्राला पाणी पुरवठा केला जात आहे. आजच्या १२.५ एकरांच्या प्रक्षेत्राच्या लगतची आजूबाजूची जागा यथावकाश व जमेल तशी टप्प्या टप्प्याने खरेदी करुन हे एकूण प्रक्षेत्र २५ ते ५० एकर एवढे करण्याचा संस्थेचा संकल्प आहे. या प्रकल्पामध्ये फळबाग, वनशेती, मसाला पिके इ. लागवड करायची आहे. हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा भविष्यकाळातील संस्थेच्या आर्थिक गरजा भागविण्याचे सामर्थ्य तो संस्थेला देईल. तसेच हा प्रकल्प ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीच्या नव्या तंत्राची ओळख करुन देणारे, शेतीव्यवसायाबद्दल नवा आशादायी दृष्टिकोन निर्माण करणारे  ते एक महत्वाचे केंद्र ठरले आहे.

संस्थेच्या आणि शेतकरी वर्गाच्या संदर्भातील कै. शामरावांची भूमिका लक्षात घेता हा प्रकल्पच कै. शामरावांचे यथोचित स्मारक ठरु शकेल.

संस्थेला शक्ती देणाऱ्या या प्रकल्पाचे शिल्पकार आहेत श्री. शिंदे गुरुजींचे चिरंजीव प्रा. प्रभाकर शिंदे. या ध्येयवेडया व जिद्दी तरुण कृषितज्ज्ञाच्या हाती प्रकल्पाचे भवितव्य सुरक्षित आहे. या प्रकल्पामध्ये आंब्यांच्या विविध जाती, नारळ, चिकू, काजू, पेरु, आवळा, जांब इत्यादी अनेक फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. हा प्रकल्प आर्थ‍िकदृष्टया सक्षम करण्यासाठी आंबा आणि चिकू फळझाडांची रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. या प्रक्षेत्रावर अतितीव्र घनता (UHDP) तंत्राने केसर, हापूस या जातींची लागवड करुन एक चांगले आंबा लागवडीचे प्रात्यक्षिक उभे करण्यात आले आहे. आंबा लागवडीसाठी ४ मिटर x २ मिटर या अंतराचा वापर करुन १ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. या प्रक्षेत्रावर अडीच x अडीच मिटर अंतरावर साग लागवड करण्यात आली आहे. जागतिक हवामान बदलामुळे आवळा बागेतील झाडांचे उत्पादन कमी झाल्यामुळे या झाडांवर आणि साग झाडांवर काळीमिरीची लागवड करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी अनेकांचे सहकार्य, विशेषत: आर्थिक सहकार्य आवश्यक आहे. यास्तव माजी छात्र, संस्थेचे व कै. शामरावजींचे चाहते व समाजातील शिक्षणप्रेमी, दानशूर व्यक्ती या सर्वांनीच संस्थेला उदार हस्ते अर्थसहाय्य करावे, असे आमचे विनम्र आवाहन आहे.