नवभारत छात्रालय आणि पू. सामंत गुरुजी कन्या छात्रालयांना सरकारी अनुदान मिळत असले तरी ते पुरेसे नसते. उर्वरित खर्चाची तरतूद संस्थेलाच करावी लागते. “परिश्रमातून स्वावलंबन” हा मंत्र पू. सामंत गुरुजींनी पूर्वीच देऊन ठेवला आहे. तोच जपून संस्थेच्या २१५ गुंठे जागेत आज कृषि केंद्राचे काम चालू आहे. कृषि केंद्राची स्थापना ९ मार्च १९८९ रोजी झाली.

आंबा, नारळ, लिंबू, जाम, चिकू इ. फळपिकांची मातृवृक्ष बाग कृषि केंद्राने विकसित केली व त्यांच्या रोपवाटिका तयार करुन शासन मान्यता मिळविली. या फळपिकांच्या कलमे, रोपे विक्रीपासून व त्याचबरोबर गुलाबफुले व भाजीपाला रोपांच्या विक्रीपासून मिळणाऱ्या उत्पन्नातून संस्था आज स्वावलंबी बनली आहे. संस्थेचा हा ऊर्जास्त्रोत संस्थेला आर्थिक ऊर्जा देत आहे. नियोजनबध्दरीत्या काम करण्याच्या ‍शिस्तीमुळे आणि प्रा. प्रभाकर शिंदे (गुरुजींचे चिरंजीव) या कृषि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे आणि परिश्रमामुळे, हा उपक्रम सुयोग्य रितीने आजही सुरु आहे.