कुणबी व तत्सम मागास समाजांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नवभारत छात्रालय आपल्या परीने झटत असताना, जोपर्यंत स्त्रियांचे शिक्षण होत नाही, तोपर्यंत सामाजिक प्रगतीचे प्रयत्न अपुरे आहेत. घरातील कर्त्या पुरुषांबरोबरच, कर्त्या स्त्रियाही सुशिक्षित व्हायला हव्यात, तरच कुटुंबाची प्रगती होईल याची जाणीव संस्थेला होती. म्हणून कै. शामरावजी पेजे यांच्या प्रेरणेने श्री. शिंदे गुरुजींनी १ जून १९७६ रोजी पू. सामंत गुरुजी कन्या छात्रालयाची स्थापना केली. कै. पू. सामंत गुरुजींच्या कामाला पूर्तता आणणारा उपक्रम आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी अशा दोन्ही अर्थांनी या कन्या छात्रालयाला त्यांचे नाव देणे औचित्यपूर्ण होते.

श्री. शिंदे गुरुजींनी आपल्या गुरुचे आणि कै. शामरावजींनी यांनी आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्याचे उभे केलेले हे सर्वोत्तम स्मारक आहे. नवभारत छात्रालयाच्याच आवारात असल्यामुळे व श्री. शिंदे गुरुजीचे नेतृत्व लाभले असल्याने, नवभारत छात्रालयाची ही छोटी बहीण आपल्या, दादाच्याच पावलावर पाऊल ठेवून मार्गक्रमण करत आहे. ध्येय तेच, आदर्श तेच, दैनंदिन कार्यक्रमही तेच. त्यामुळे या कन्या छात्रालयातील छात्रांची मंजूर संख्या ५० असली तरी आणखी ५-१० मुलींची सोय करावी लागते इतका चांगला प्रतिसाद समाजाकडून आहे. आजवर सुमारे साडेआठशे कन्या छात्रालयातून शिक्षित, उच्चशिक्षित होऊन बाहेर पडल्या आहेत. श्रीम. आशा गोंडाळकर (सेवानिवृत्त शेती अधिकारी, रायगड), प्रतिक्षा म्हाप्रोळकर (महाराष्ट्र पोलीस), सौ. वर्षा वसंत उदेग, मु. कळवंडे, ता. चिपळूण (प्रगतशील शेतकरी व उद्योजिका) अशी काही उल्लेखनीय नावे सांगता येतील.

२०२६ साली हे कन्या छात्रालय सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.