सन २००८-०९ हे वर्ष संस्थेच्या इतिहासात एक नवीन पर्व निर्माण करणारे ठरले. मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर हे कुणबी सेवा संघ, लांजे या आपल्या मातृसंस्थेचे संस्थापक सदस्य होते. त्यांचे आपल्या संस्थेशी असलेले नाते त्यांचे चिरंजीव श्री. विश्वासराव खेर व त्यांचे जेष्ठ बंधु कै. सुनित खेर यांनी दृढ करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार सन २००३ ते २००७ अशी चार वर्षे ते आपल्या संस्थेला नियमितपणे भेट देत होते. संस्थेने चालविलेली दोन छात्रालये तसेच अन्य उपक्रम पाहुन ते प्रभावित झाले व या संस्थेतील एखाद्या नवीन उपक्रमाला अर्थसहाय्य पुरविण्याची इच्छा व्यक्त केली. उपक्रम दोन्ही छात्रालयातील छात्र व छात्रा यांना व ग्रामीण जनतेला उपयुक्त ठरेल असा असावा, एवढीच त्यांची अपेक्षा होती. ही अपेक्षा लक्षात घेऊन व संस्थेकडे असलेल्या मुलभूत सुविधा लक्षात घेऊन संस्थेने “कृषी उद्योग व प्रशिक्षण केंद्र” या उपक्रमाचा आराखडा त्यांना सुचविला. त्यांनी ते मान्य करुन “सरस्वती बाळ गंगाधर खेर फाऊंडेशन” या आपल्या संस्थेमार्फत या प्रकल्पाच्या पुर्ततेसाठी आवश्यक ते अर्थसहाय्य देण्याचे मान्य केले. या ट्रस्टकडून प्रकल्पासाठी एकूण रु. ६३,९२,३९९/- अनुदान आजवर उपलब्ध झाले आहे. या प्रकल्पाला “बाळासाहेब खेर कृषि उद्योग व प्रशिक्षण केंद्र” असे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी ६९५ चौ.मिटर आकाराच्या इमारतीचे बांधकाम २०१०-११ या आर्थिक वर्षात सुरु करुन सन २०१७-१८ साली पूर्ण करण्यात आले. बांधकामाचा आराखडा आणि इतर तांत्रिक मदत, देखभाल आर्किटेक्ट श्री. सुभाष दळी यांनी केली. या भव्य इमारतीचे समारंभपूर्वक उद्घाटन मा. श्रीमती. सोनवी देसाई, ट्रस्टी, सरस्वती ॲण्ड बाळ गंगाधर खेर फाऊंडेशन यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक ८ मार्च २०१५ रोजी करण्यात आले.
फळप्रक्रिया व अन्नप्रक्रिया पदार्थ तयार करण्यासाठी आवश्यक तो परवाना अन्न व औषध प्रशासन विभागाकडून उपलब्ध करुन घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत महिला बचत गटांना फळप्रक्रिया व अन्नप्रक्रिया पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.