पू. अप्पासाहेब हे आमच्या मूळ संस्थेचे संस्थापक. अहिंसा, सत्य, अस्तेय इ. एकादश व्रतांचे उपासक, विद्वत्तेला मानवतेच्या सेवेची जोड देणारे महान देशभक्त. त्यांचे स्मरण आमच्या छात्रांना नित्य व्हावे म्हणून त्यांच्या नावाने १० लाख रुपयांचा निधी गोळा करण्याचा संस्थेचा संकल्प होता. या निधीच्या व्याजातून गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांची आर्थिक अडचण दूर व्हावी म्हणून वरील निधी स्थापन करण्याचा निर्णय संस्थेने घेतला. या निधीच्या स्थापनेची प्रेरणा जणू कै. पू. अप्पांनीच संस्थेचे माजी अध्यक्ष श्री. ‍शिंदे गुरुजी यांना दिली.

१९९९ च्या मार्च महिन्यात पू. अप्पांच्या नावाचा “अप्पासाहेब पटवर्धन पुरस्कार” गुरुजींना मिळाला. आपल्याला अप्पांच्या नावाचा पुरस्कार मिळणे याचा अर्थ अप्पांचे काम आणि नाव लोकांच्यात पोहचविण्याची जबाबदारी आपल्या शिरावर येणे असा गुरुजींनी त्याचा अर्थ लावला. पुरस्काराच्या रु. २,५००/- च्या रक्कमेत स्वत:चे रु. ५२५/- घालून रु. ३,०२५/- रुपयांचा हा निधी “ अप्पासाहेब पटवर्धन स्मृती निधी” या नावाने गुरुजींनी स्थापन केला व त्याला संस्थेची मान्यता मिळविली. या निधीच्या व्याजातून गरजू गुणवंत विद्यार्थ्यांची आर्थिक अडचण दूर करण्याचा संकल्प सोडून हा निधी वाढविण्याचे ठरले. या आर्थिक वर्षअखेरीस या निधीमध्ये रु. ५,००,०००/- इतकी रक्कम जमा आहे. या निधीच्या व्याजातून छात्रालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक गरजा भागविल्या जातात.