कै. अप्पासाहेब पटवर्धन, कै. पू. द. सी. सामंत गुरुजी व लोकनेते कै. शामरावजी पेजे यांच्या प्रेरणेने 1 जून 1947 मध्ये सुरु झालेले नवभारत छात्रालय म्हणजे जणू एक आधुनिक गुरुकुलच होय. ज्ञान, चारि«य आणि स्वावलंबन या मूल्यांचे संवर्धन हे छात्रालयाचे ब्रीद ठरवून कै. पू. सामंत गुरुजींनी स्थापनेपासून तो इहलोकाचा निरोप घेईपर्यंत जानेवारी 1966 पर्यंत या छात्रालयाचे संगोपन केले. छात्रालयाच्या सुदैवाने शिवप्रताप व काळूाम शेठ मालू हे बंधूद्वय, श्रीमती शैलाताई व डॉ. गंगाधर मंडलीक हे दांपत्य, स्वातं«य सैनिक चंदुभाई मेहता अशी सेवाभावी व उदार स्नेही मंडळी गुरुजींच्या छात्रपरिवारात दाखल झाली. गुरुजींच्या तपश्चर्येमुळे हे छात्रालय, भारत सरकारचे भूतपूर्व बॅकवर्ड क्लास कमिशनर श्री. श्रीकांत यांच्या शब्दात सांगायचे तर "भारतातील एक आदर्श छात्रालय" ठरले व कै. पू. सामंत गुरुजी "आधुनिक सांदिपनी" म्हणून जनमानसात गौरविले गेले. श्री. पांडुरंग शिंदे गुरुजी हे या छात्रालयाचे पहिले विद्यार्थी.
कै. पांडुरंग शिंदे गुरुजी यांनी या छात्रालयाचे व्यवस्थापन कै. सामंत गुरुजींच्या पश्चात 60 वर्षे केले व छात्रालय नावारुपास आणले. या छात्रालयाने रत्नागिरी जिल्हयाच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात नेत्रदिपक कार्य केले आहे. खेडया – पाडयातून येऊन छात्रालयात दाखल झालेल्या गरीब, अडाणी मुलांमधून शिक्षण, समाजसेवा, राजकारण अशा विविध क्षेत्रात नेत्रदिपक कर्तबगारी गाजविणाऱ्या विद्यार्थ्यांची एक मोठी परंपरा छात्रालयाने निर्माण केली. प्रकांड पंडित, भारतरत्न महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणे हे कुणबी सेवा संघाचे तहयात सभासद होते. एम. ए. (संस्कृत) च्या परीक्षेत त्यांनी "झाला वेदान्त पारितोषिक" पटकाविले होते. नवभारत छात्रालयाच्या रघुनाथ गीते या विद्यार्थ्यांने, तेच पारितोषिक पटकावून महामहोपाध्यायांच्या पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याचा असामान्य पराक्रम केला. हेच रघुनाथ गीते मुंबई विद्यापीठातील संस्कृतचे एक नामवंत प्राध्यापक म्हणून लौकिकास पात्र झाले.
राजकीय क्षेत्रात महाराष्ट्राचे राज्यमंत्रीपद भूषविलेले लक्ष्मणराव हातणकर व खेडचे माजी आमदार तु. बा. कदम, आणि मुरबाडचे माजी आमदार दिगंबर विशे यांनी आपले कर्तृत्व नोंदविलेले आहे.
कै. सामंत गुरुजींचे प्रथम छात्र श्री. पांडुरंग ग. शिंदे गुरुजी यांनी गुरुजींच्या पश्चात छात्रालयाची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन गुरुभक्तीचा व समाजसेवेचा एक आदर्शच उभा केला. सन 1966 पासून सन 2009 पर्यंत आयुष्याची 60 वर्षे छात्रालयाची धुरा वाहत असताना श्री. शिंदे गुरुजींनी छात्रालयाची भौतिक वाढ व आर्थिक स्वावलंबन या बाबींकडे विशेष लक्ष दिले. त्यामुळे 35-40 विद्यार्थी संख्या असलेल्या या छात्रालयात आज जवळपास सव्वाशे छात्र असतात. छात्रांची वाढलेली संख्या, त्याबरोबर इमारती, फर्निचर, पुरेसा व आरोग्यदायी आहार ही सर्व लक्षणीय प्रगती ही श्री. शिंदे गुरुजींच्या नियोजनबध्द परिश्रमांची फलश्रुती. पण ही भौतिक प्रगती साधीत असताना पू. सामंत गुरुजींनी घालून दिलेली शिस्त, ज्ञानसाधना व मूल्यसंस्कार या छात्रालयाच्या प्राणभूत गोष्टींकडे श्री. शिंदे गुरुजींचे जराही दुर्लक्ष झाले नाही. परिणामी कर्तृत्ववान विद्यार्थ्यांची परंपरा अखंड चालू राहिली.
कोकण कृषि विद्यापीठाच्या फलोद्यान विभागाचे प्रमुख डॉ. गोविंद जोशी, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अर्जुन मुरुडकर यांच्यासारख्या विद्यार्थ्यांनी प्रा. गीते यांचा वारसा जपला आहे. माजी केंद्रीय ऊर्जा मंत्री व माजी खासदार श्री. अनंत गीते यांनी ना. हातणकर, कदम, विशे यांची परंपरा पुढे नेली आहे. श्री. तु. बा. कदम यांनी भरणे – खेड येथे कुणबी शिक्षण संस्थेचा प्रपंच मांडून व श्री. हरिश्चंद्र गीते यांनी रत्नागिरीच्या खेर ट्रस्ट व सर्वोदय छात्रालयाची धुरा सांभाळून कामात सहभाग देऊन सामंत – शिंदे या गुरुद्वयांच्या पावलांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. या छात्रामधील कै. पांडुरंग गणपत शिंदे गुरुजी (समाजसेवक), माजी राज्यमंत्री कै. लक्ष्मणराव हातणकर, कै. तु. बा. कदम, कै. दिगंबर विशे (माजी आमदार), माजी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री श्री. अनंतराव गीते (राजकारण), प्रा. रघुनाथ गीते, प्रा. हरिश्चंद्र गीते, श्री. गजानन चाळके, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी, श्री. सदाशिव चव्हाण, मॅनेजर सेंट्रल बॅक ऑफ इंडिया, डॉ. अनंत पाटील, उपव्यवस्थापक, राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बॅक, श्री. हरिश्चंद्र मनवळ, प्रथमवर्ग पशुधन अधिकारी, श्री. सुहास वायंगणकर, राष्ट्रपती पारितोषिक विजेते, श्री. प्रदिप इप्ते, मॅनेजर, बॅक ऑफ महाराष्ट्र, श्री. लहू केसरकर, मॅनेजर स्टेट बॅक ऑफ इंडिया, डॉ. राजन खांडेकर, सेवानिवृत्त सहयोगी अधिष्ठाता, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे (कुडाळ), श्री. सुनिल गुरव, मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी, श्री. दिनेश तुकाराम राणे, कृषि विस्तार अधिकारी, पंचायत समिती, खेड, श्री. अजय कांबळे, सहाय्यक महाप्रबंधक घरडा केमिकल लि., डॉ. संदिप मासये, सहाय्यक प्राध्यापक, भाजीपाला विभाग, एस. पी. कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर ॲण्ड फॉरेस्ट्री, नवसारी कृषी विद्यापीठ नवसारी, श्री. सिद्धार्थ म्हादे, वरीष्ठ प्रबंधक, युनियन बॅक ऑफ इंडिया, श्री. विश्वनाथ तुकाराम तांबडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, सानेगुरुजी विद्यामंदिर, पालगड अशा विविध क्षेत्रात कोकणचे नेतृत्व करणाऱ्या कर्तृत्ववान छात्रांची परंपरा या छात्रालयाने निर्माण केली आहे.
यांच्याखेरीज शेकडो विद्यार्थी शिक्षक, प्राध्यापक, शासकीय अधिकारी, बॅक अधिकारी अशा बहुविध भूमिकांतून समाजात वावरत असताना आपली स्वत:ची खास वेगळी ओळख ठेवून आहेत. स्वच्छ चारि«य, सामाजिक कर्तव्याचे भान आणि कार्यक्षमता या गुणांची ती ओळख आहे. छात्रालयाने ती आभूषणे त्यांना दिलेली आहेत. आजवर सुमारे 3500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना छात्रालयाचा लाभ झालेला आहे.
विद्यार्थी असे घडावेत असाच छात्रालयाचा दैनंदिन कार्यक्रम असतो. आश्रमीय पध्दतीप्रमाणे प्रात:काळी व सायंकाळी दैनिक प्रार्थना असते. अधून मधून बौध्दिके असतात. वर्तमानपत्राचे नित्य वाचन असते. भित्तीपत्रकाच्या स्वरुपात “भरारी” मासिक चालविले जाते. थोरामोठयांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात. बाहेरील नामवंत वक्त्यांची भाषणे आयोजित केली जातात. वक्तृत्व, निबंध, गायन, नाटयाभिनय अशा स्पर्धांचे आयोजन छात्रांसाठी केले जाते.
बौध्दिक विकासाबरोबरच शारिरीक विकासही व्हावा म्हणून क्रीडासाहित्य व क्रीडांगणाची सोय, व्यायामशाळा या सोयी – सुविधा पुरविल्या जातात. अभ्यासासाठी दृकश्राव्य माध्यमांची सोय, स्वतंत्र अध्ययन कक्ष, या सोयी केलेल्या आहेत. स्वत:च्या गृहपाठाबरोबरच वरिष्ठ छात्रांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासवर्गही चालविले जातात. ए. जी. हायस्कूलच्या निवृत्त प्राचार्या श्रीमती प्रभाताई करमरकर, प्रा. रविंद्र सलाग्रे यांच्यासारख्या नामवंत अध्यापकांच्या मार्गदर्शनाचा लाभही छात्रांना मिळत असे.
विद्यार्थी पोषाखी बनू नयेत, शारिरीक श्रमही महत्त्वाचे आहेत हा संस्कार दृढमूल करण्यासाठी कृषिकेंद्रात व छात्रालयाच्या शेतात त्यांच्याकडून श्रमदानही करुन घेतले जाते. शेतीच्या कामाचा नव्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या घरची शेती सुधारते आणि नोकरी व्यवसायात उमेदवार म्हणून त्यांचे मूल्य वाढते, असे अनुभवास आले आहे. हे सर्व उपक्रम राबवूनही किंबहुना त्यामुळेच छात्रालयाचे 10 वी, 12 वी, पदवी व पदव्युत्तर परीक्षांचे निकाल 100 टक्के लागतात.
नवभारत छात्रालयाला 2023 साली 75 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने अमृत महोत्सवी वर्ष साजरे करुन, अमृत महोत्सवी स्मरणिका प्रसिध्द करण्यात आली आहे. यामध्ये माजी छात्र, संस्थेचे कार्यकर्ते, हितचिंतक यांचे लेख प्रसिध्द करण्यात आले आहेत. या स्मरणिकेत छात्रालयात 75 वर्षात घडलेले अनेक ऐतिहासिक बाबींची नोंद करण्यात आली आहे.