छात्रांच्या रुपाने उद्याचे सक्षम, समर्थ नागरिक घडवित असतानाच ते ज्या घरातून येतात ती घरे मजबूत व्हावीत, ते ज्या आर्थिकदृष्टया दुर्बल कुटुंबातून येतात ती कुटुंबे सक्षम व्हावीत, ते ज्या परिसरातून येतात त्या परिसराचा कायापालट होऊन तो समृध्द व्हावा हे परिवार उपक्रमाचे उद्दीष्ट आहे. या उपक्रमात संस्थेच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. नवभारत छात्रालय परिवारांतर्गत खालील प्रमाणे उपक्रम घेण्यात येतात.

अ) प्रशिक्षण –

शेती आणि शेतीपूरक उद्योगामध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे संस्थेला आवश्यक वाटते. शेतकऱ्यांसाठी एक ते दोन दिवसाच्या मुदतीची प्रशिक्षणे आयोजित केली जातात. तज्ज्ञ व अनुभवी प्रशिक्षकांमार्फत शेतकऱ्यांना दृकश्राव्य (LCD Projector) माध्यमांद्वारे प्रशिक्षणे दिली जातात. प्रशिक्षण विषयांच्या संबधित प्रात्यक्षिके संस्थेमध्ये आयोजित केली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना परिपूर्ण ज्ञान मिळते. प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये आवश्यकतेनुसार आधुनिक पध्दतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर भेट आयोजित केली जाते. प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण घेण्यापूर्वी आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर मूल्यमापन केले जाते. तसेच प्रशिक्षणाविषयी प्रशिक्षणार्थींकडून त्रुटी व उणिवा समजून घेऊन त्यानुसार भविष्यकालीन प्रशिक्षणात सुधारणा करण्यात येते.

संस्थेच्या मुख्यालयापासून दूरवर राहणाऱ्या प्रशिक्षणार्थींसाठी अत्यंत माफक शुल्काने निवास व्यवस्था केली जाते. प्रशिक्षणे परिणामकारक होण्यासाठी एका प्रशिक्षण वर्गाला साधारणपणे २५ ते ३० प्रशिक्षणार्थींना प्रवेश दिला जातो. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना संस्थेमार्फत भोजन, प्रमाणपत्र आणि संपूर्ण प्रशिक्षणाची टिप्पणी (Note) पुरविली जाते. प्रशिक्षणामध्ये कोकणातील सर्व जिल्हयातील प्रशिक्षणार्थींचा समावेश असतो. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींकडून नाममात्र शुल्क घेतले जाते. प्रशिक्षणे दरवर्षी सर्वसाधारणपणे जानेवारी महिन्यात आयोजित केली जातात. या व्यतिरिक्त बाळासाहेब खेर कृषि उद्योग आणि प्रशिक्षण केंद्र या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील महिला बचत गटांसाठी एक दिवशीय फळप्रक्रिया व अन्नप्रक्रिया विषयक प्रशिक्षण दिले जाते.

आ) भाजीपाला बियाणे वाटप –

नवभारत छात्रालय परिवारांतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना परसबागेतील पावसाळी भाजीपाला लागवडीची आवड निर्माण होऊन नागरिकांना पोषणयुक्त आहार उपलब्ध व्हावा या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उपलब्धतेनुसार काकडी, चिबूड, पडवळ, कारली, भोपळा, दूधी भोपळा, भेंडी, शिराळी इत्यादी प्रकारच्या बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात येते. बियाणे वाटप करताना खेडेगावातील एखादी वाडी किंवा काही कुटुंबे यांचा अंतर्भाव केला जातो. बियाणे शक्यतोवर दरवर्षी २५ ते ३० मे दरम्यान वाटप केले जाते. शेतकऱ्यांनी पावसाळा सुरु होण्यापूर्वी बियाणे रुजवावे अशी अपेक्षा असते. या बियाण्यांसोबत लागवडीसंबंधी माहितीपत्रिका पुरविली जाते. यामध्ये बियाण्यांचा तपशील लागवडीसाठी जागेची निवड, लागवडीचा हंगाम, लागवडीचे अंतर, लागवडीची पध्दत, योग्य खतांची निवड व इतर निगराणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन असते. या उपक्रमांतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी उत्पादित व शिफारस केलेल्या जातींचे बियाणे पुरविण्यात येते. त्यामुळे असे दर्जेदार बियाणे शेतकरी उत्पादित करुन स्वत:साठी वापर करुन इतर शेतकऱ्यांना पुरवू शकतात.

इ) वनझाडे व फळझाडे वाटप –

संस्थेच्या दृष्टीने सर्वसामान्य शेतकरी शेती व्यवसायामध्ये फार मोठी गुंतवणूक करु शकत नाही याची संस्थेला जाणीव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमीत कमी गुंतवणूकीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या वनस्पतींची माहिती देण्यात येते. कोकणामध्ये जून ते सप्टेंबर महिन्यात नियमित आणि भरपूर पाऊस पडत असल्यामुळे पावसाच्या सुरुवातीला साग, रिठा, खैर इत्यादी वनझाडे, त्याचबरोबर आंबा, चिकू, काळीमिरी, काजू रोपे/कलमे, नारळ, कोकम रोपे इत्यादी झाडांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. हे ओळखून संस्थेमार्फत दरवर्षी वर उल्लेख केलेल्या रोपांचे मोफत वाटप करण्यात येते.

ई) कोकम लागवड –

कोकम फळापासून मोठयाप्रमाणात फळप्रक्रिया पदार्थ तयार होत असल्याने कोकम फळांची मागणी वाढली आहे. या पिकाला सिंचनाची गरज आहे. एका पूर्ण वाढीच्या झाडापासून सरासरी १०० किलो कोकम फळांचे उत्पन्न मिळते. त्याची बाजारभावाने रु. २,५००/- इतकी किंमत होते. या झाडाला सुरुवातीची पाच वर्षे गुरे व वन्य प्राणी यांपासून संरक्षण द्यावे लागते. कोकमाला कोकणात खत देण्याची पध्दत नाही. तसेच कोणत्याही प्रकारचे पीक संरक्षण आवश्यक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात कोकम लागवड करणे आवश्यक आहे. हे ओळखून संस्थेमार्फत दरवर्षी पाच ते सहा हजार कोकम रोपांचे मोफत वाटप करण्यात येते.

उ) उपसा जलसिंचन मार्गदर्शन –

कोकणामध्ये विशेषत: रत्नागिरी जिल्हयामध्ये विपूल असे भूजल बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहे. उपलब्ध भूजलाचा वापर करण्यासाठी उपसा जलसिंचन प्रकल्प राबविल्यास शेतीसाठी पाणी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत आणता येते. शेतीमध्ये पाण्याची उपलब्धता असल्यास भाजीपाला, तेलबिया, डाळी इत्यादी कमी कालावधीची पिके लावून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविता येते. तसेच नारळ, सुपारी, चिकू, कोकम व मसाला पिके यांची लागवड करता येते. आंबा, काजू या पिकांना सुद्धा पाणी पुरवठा केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन, फळांच्या प्रतिमध्ये सुधारणा होते. नवभारत छात्रालय परिवारांतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्याच्या स्त्रोताचे व लागवड क्षेत्राची पाहणी करुन उपसा जलसिंचन करण्याविषयी मार्गदर्शन केले जाते. कोकणामध्ये सर्वसाधारणपणे पाणी खोलगट भागात उपलब्ध असते आणि लागवड क्षेत्र उंचावर असते. त्यामुळे उपसा जलसिंचन योजना तयार करताना, पंप, पाईप लाईन निवडताना, शेतकऱ्याला आवश्यक पाण्याच्या विसर्गाबरोबरच, पाणी चढविण्याच्या उंचीचा विचार प्रामुख्याने करावा लागतो. या परिवारांतर्गत पुढील प्रमाणे शेतकऱ्यांना उपसा जलसिंचन योजना तयार करुन देण्यात आल्या आहेत.

अ.क्र.

शेतकऱ्याचे नाव

गाव

प्रयोजन

पाईप लाईनची लांबी

गायकरवाडी

खेर्डी, ता. दापोली

वाडीला घरगुती वापरासाठी पाणी

५०० मीटर

रघुनाथ धोंडू मेंगे

सडवे, ता. दापोली

शेतीसाठी पाणी

१५०० मीटर

पांडुरंग भागोजी गायकर

खेर्डी, ता. दापोली

शेतीसाठी पाणी

५०० मीटर

मुकेश शांताराम खांबे

कोळबांद्र, ता. दापोली

शेतीसाठी पाणी

१२५० मीटर

वरील सर्व उपसा जलसिंचन प्रकल्प आजही चांगल्या प्रकारे सुरु आहेत. प्रकल्प तयार करताना पाण्याची वाहतूक करायची लांबी, पाणी चढविण्याची उंची व त्याअनुसार योग्य तो पंप, यासाठी आवश्यक खर्चाचा तपशील शेतकऱ्याला दिला जातो. आवश्यक असल्यास कर्ज प्रकरणे तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. कोकणातील शेतकऱ्यांनी परिवाराच्या या मार्गदर्शनाचा उपयोग करुन घ्यावा.

ऊ) सूक्ष्म सिंचन/ ठिबक सिंचन बसविण्यासाठीचे मार्गदर्शन –

सूक्ष्म सिंचनाविषयी परिवारांतर्गत दरवर्षी दोन दिवसांचे शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. सूक्ष्म सिंचनामध्ये, सिंचन व्यवस्थेचा आराखडा तयार करणे, साहित्य खरेदीसाठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज घेणे, योग्य उत्पादकाकडून साहित्य खरेदी करणे, सिंचन संचाची शेतामध्ये प्रत्यक्ष जोडणी करणे आणि प्रत्यक्ष पीक लागवड करणे इत्यादी विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन, मदत करण्यात येते.

ए) शेतीसाठी कर्जप्रकरण तयार करण्यासाठी मार्गदर्शन –

शेतीला बॅकेमार्फत वित्त पुरवठा होण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मदत केली जाते. संस्थेच्या मध्यस्थीमुळे कर्जपुरवठा होणे सुखकर होते.

ऐ) भाजीपाला व फळबाग लागवडीचे मार्गदर्शन –

सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना भाजीपाला, तेलबिया, कडधान्य इत्यादी सारख्या कमी कालावधीच्या पिकांच्या लागवडी विषयी, शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन तज्ज्ञ प्रशिक्षकामार्फत मार्गदर्शन केले जाते. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या फळबाग लागवडीत अपेक्षेनुसार उत्पन्न येण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन केले जाते. शेतकऱ्यांना सहजपणे त्यांच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी, ^कुणबी सेवा संघ शेतकरी परिवार* या नावाने व्हॉटस् ॲप ग्रुप (WhatsApp Group) तयार करण्यात आला आहे. यामार्फत शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करुन शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात येते.

ओ) शेतकऱ्यांसाठी कृषीविषयक सहलीचे आयोजन –

केवळ तंत्रज्ञानाबद्दल माहिती देण्यापेक्षा, चांगल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेताला भेट दिल्यास, शेती तंत्रज्ञानाचे आकलन परिणामकारक होते. ही बाब लक्षात घेऊन १ ते २ दिवसाच्या कालावधीच्या शेतकरी सहली आयोजित केल्या जातात. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

नवभारत छात्रालय परिवार हा उपक्रम यशस्वी झाल्यास खेडयातील आर्थिकदृष्टया दुर्बल शेतकरी आपला वर्तमानकाळ निश्चितच आशादायी बनवू शकेल. यास्तव जनहिताची कळकळ असणाऱ्या समस्त बंधू – भगिनींना संस्थेमार्फत आवाहन करीत आहोत की, त्यांनी या उपक्रमाचे कार्यकर्ते बनून या परिवारात दाखल व्हावे.